खालील वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा.
उदा. तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे !
नीलकमल – नील असे कमल.
(अ) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे. महाराष्ट्र – महान असे राष्ट्र
(आ) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे. भाषांतर – अन्य अशी भाषा
(इ) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे. पांढराशुभ्र – शुभ्र असा पांढरा
कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये
(अ) दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
(आ) कधी पूर्वपद विशेषण असते. उदा. नीलकमल
(इ) कधी दुसरे पद विशेषण असते. उदा. घननीळ
(ई) कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदा. श्यामसुंदर.
(उ) कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदा. कमलनयन, नरसिंह
(ऊ) कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा. विद्याधन
कर्मधारय समास (व्याख्या)
ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, त्याला ‘कर्मधारय समास’ असे म्हणतात.
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
(अ) रक्तचंदन – रक्ता सारखे चंदन
(आ) घनश्याम – घना सारखा श्याम
(इ) काव्यामृत – काव्य हेच अमृत
(ई) पुरुषोत्तम – उत्तम असा पुरूष
द्विगू समास
खालील वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
उदा., नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे. पंचारती – पाच आरत्यांचा समूह.
(अ) असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही. त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
(आ) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
(इ) शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. सप्ताह – सात दिवसांचा समूह
द्विगू समासाची वैशिष्ट्ये
(अ) द्विगू समासात पूर्वपद संख्यावाचक असते.
(आ) हा समास नेहमी एकवचनात असतो.
(इ) सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो.
द्विगू समास (व्याख्या)
ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा, त्यास द्विगू समास असे म्हणतात.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(अ) अष्टाध्यायी – आठ अध्यायांचा समुदाय
(आ) पंचपाळे – पाच पाळ्यांचा समुदाय
(इ) द्विदल – दोन दलांचा समुदाय
(ई) बारभाई – बारा भावांचा समुदाय
(उ) त्रैलोक्य – तीन लोकांचा समुदाय
अपठीत गद्य आकलन
उतारा वाचून दिलेली कृती करा.
जंगलाने सर्वांचे स्वागत केले – दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी,
तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते.
एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस. भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा.
जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.
(अ) तक्ता पूर्ण करा.
जंगलाचा स्वभाव
मोकळाढाकळा.
सर्व कृती मनसोक्तपणे
व सहजपणे करते.
माणसाचा स्वभाव
मनात अढी धरतो
तेढ बाळगतो.
मनात सतत संकोच
संशय असतो.
(आ) चौकटी पूर्ण करा.
जंगल करत असलेल्या मानवी क्रिया
१. लपंडावखेळणे. २.गप्पा मारणे,कुजबुजणे. ३. खेळणे, डुलणे. ४. हसणे, गाणे.
(इ) खालील कृती करा.
(१) खालील शब्दांची जात ओळखा.
जंगल नागमोडी
नाम विशेषण
(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
रीतिवर्तमान काळ.
(ii) सहसंबंध लिहा.
कोपरे : कोपरा पाने : पान
स्वमत.
जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.
जंगलाचा स्वभाव खरोखरच मोकळाढाकळा असतो. त्याच्याकडे लपवाछपवी वा लबाडी नसते. सगळा पारदर्शी कारभार ! मोकळेढाकळेपणा जंगलाच्या वर्तनातही आढळतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी जंगल लपंडाव खेळते. दंगामस्ती करते. गप्पागोष्टी करते. भर पावसात जंगलातील सर्व झाडेझुडपे शेंड्यापासून मुळापर्यंत पाण्याने निथळत असतात. अगदी मनसोक्त !
- टर्न अँड टॉक ऍक्टिविटी: एक प्रभावी शिक्षण पद्धत
- शिक्षकांस पाठटाचण लिहण्यास मदत करणारे Ai टूल्स
- शिक्षकांसाठी सर्वोत्तम AI टेक्स्ट-टू-स्पीच टूल्स
- मुलांसाठी सर्वोत्तम संशोधन वेबसाईट्स
- शिक्षकांसाठी Ai prompt लिहण्यासाठी ChatGPT वापरण्याच्या ४ महत्वाच्या युक्त्या