एकूण किती दिशा आहेत? हे तुम्हाला माहित आहे का?

E-Swadhyay
3 Min Read
आवडल तर शेअर करा.

एकूण दिशा किती ?

सामान्यतः सूर्य जिकडे उगवतो ती पूर्व, तो मावळतो ती पश्चिम, पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले असतो उजवीकडील ती दक्षिण व डावीकडची ती उत्तर अशा चार प्रमुख दिशा मानतात. तसेच रात्रीच्या वेळी आपण उत्तरेकडे म्हणजे ध्रुवताऱ्याकडे तोंड करून उभे राहिलो, तर आपल्या बरोबर पाठीमागे येते ती दक्षिण दिशा. आपल्या उजव्या हातास येते ती पूर्व दिशा आणि डाव्या हातास येते ती पश्चिम दिशा मानतात.

( पृथ्वीचा आस जवळजवळ ध्रुवताऱ्याकडे रोखलेला असल्यामुळे उत्तर गोलार्धात रात्रीच्या वेळी ध्रुवताऱ्यावरूनही उत्तर दिशा ठरविता येते. त्यानुसार उत्तर दिशा ०° मानून तिच्यापासून डावीकडे इष्ट ठिकाण ज्या दिशेस असेल तेथपर्यंतचा कोन मोजून त्या ठिकाणाची दिशा सांगता येते. उदा. पूर्व दिशा म्हणजे ९०°, पश्चिम २७०°, आग्नेय म्हणजे १३५° इ.. ‘ध्रुवतारा’ (Polaris; Alpha Ursa Minoris) दिसल्यावर उत्तर दिशा सापडते. परंतु ध्रुवतारा हा काही चटकन ओळखता येईल, असा फारसा ठळक तारा नाही. ध्रुवतारा शोधण्याची एक युक्ती आहे. एकतर तो सप्तर्षी (Ursa Major Constellation) तारकासमूहावरून ओळखता येतो, नाही तर शर्मिष्ठा (Cassiopeia Constellation) तारकासमूहावरून ओळखता येतो. कारण या दोन तारकासमूहांपैकी एकतरी तारकासमूह रात्रीच्या आकाशात नेहमीच दिसत असतो… सप्तर्षी तारकासमूहात सात ठळक तारे आहेत. हे तारे काल्पनिक रेषांनी जोडले, तर त्यांचा आकार काहीसा पतंगासारखा होतो. चार ताऱ्यांनी बनलेला शंकरपाळ्याच्या आकाराचा पतंग आणि त्याला लगत तीन ताऱ्यांची शेपटी. या पतंगाच्या पहिल्या दोन ठळक ताऱ्यांमध्ये जे अंतर दिसते, त्याच्या साधारण साडेपाच पट अंतरावर, त्याच सरळ रेषेत पाहत गेलो तर आपण ध्रुवताऱ्यापाशी पोहोचतो.. शर्मिष्ठा तारकासमूहाचा काल्पनिक आकार पाच ठळक ताऱ्यांनी बनलेला आहे. या ताऱ्यांनी इंग्रजी ‘एम्’(M) सारखी आकृती तयार करता येते. यातल्या पहिल्या तीन ताऱ्यांचा एक समभुज त्रिकोण बनतो, तर त्याला लगतचा त्रिकोण मात्र विशालकोन त्रिकोण बनतो. या ‘एम्’आकारातला तिसरा आणि चौथा तारा कल्पनेने जोडायचा. या जोडरेषेला कल्पनेने एक लंबदुभाजक (Perpendicular bisector) काढायचा, म्हणजे त्या त्रिकोणाच्या छोट्या रेषेच्या मध्यातून काटकोनात जाणारी एक रेषा काढायची. ही लंबरेषा आपल्याला थेट ध्रुवताऱ्याशी आणून सोडते…सप्तर्षी आणि शर्मिष्ठा या दोनही तारकासमूहांवरून आपण ज्या रेषांची कल्पना करतो, त्या जागेमध्ये ध्रुवताऱ्यापेक्षा अधिक ठळक असा दुसरा कोणताही तारा नाही. म्हणूनच ही युक्ती उपयोगी ठरते. )

या मुख्य दिशांच्या दरम्यान आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य, ईशान्य किंवा अनुक्रमे दपू, दप, उप आणि उपू अशा उपदिशा मानतात. तसेच या सर्व दिशांच्याही दरम्यान आणखी आठ व सोळा उपदिशा मानून सर्वेक्षण, नौकानयन वगैरेत बत्तीस दिशा मानतात.

आपल्याकडे दश-दिशा असे म्हणण्याचा एक प्रघात आहे. त्यात खाली चित्रात दिलेल्या आठही दिशा क्षितिजावर दर्शविण्यात येतात. तर ‘वरच्या दिशेला ‘उर्ध्व’ आणि ‘पायाखाली असलेली ‘अधर’ यांचा समावेश वरील आठ दिशांसोबत केला जातो. त्यामुळे एकूण दिशा दहा होतात.

Forwarded.

TAGGED:
Share This Article